अष्टविनायक

अष्टविनायकाची महती आणि माहिती

अष्टविनायक
अष्टविनायक

सध्या सगळीकडे गणपती येणार म्हणून लगबग चालू आहे. खरं तर ही सगळी लगबग तशी जरा उशिराच चालू झाली म्हणा कोरोनामुळे.  पूर्वी गणपती येणार म्हणून लोक महिनाभर आधीच कामांना सुरूवात करायचे. मग ती साफसफाई असो वा रंगरंगोटी असो. मग यावर्षी कुठला मखर करायचा???? हा प्रश्न डोक्यात टिक टिक करायला सुरुवात करायचा. या वर्षी काय तर किल्ला करू… त्या वर्षी अष्टविनायकाचे मखर करू. मग या अशा देखव्यांतून आपल्याला कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो तर कधी अष्टविनायकांचे दर्शन घडते.

आपल्या प्रत्येकाच्या मनात एकदातरी अष्टविनायक करावे अशी सुप्त इच्छा असते. कोणाची ती पूर्ण होते, तर कोणाची लांबते. काय कारण आहे की अष्टविनायकाचे एकदा तरी दर्शन घ्यावे ? काय कारण आहे की अष्टविनायकाला लोक एवढे मानतात ? का करतात लोक अष्टविनायकाची यात्रा ? तर या आणि अशा बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे गणपतीवरील आपली असणारी श्रद्धा. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे अख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. कुठलेही शुभकार्य करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो कारण आपण हे मानतो की बाप्पा आपले काम पूर्ण करणारच आणि त्यात कुठलाही विघ्न येऊ देणार नाही. हीच इच्छा, हीच भक्ती आपल्याला अष्टविनायकांचे दर्शन घ्यायला भाग पाडते.

अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे. अष्टविनायकातील गणपतीच्या मूर्ती या स्वयंभु आहेत म्हणजेच त्यांना कुठलाही मानवी स्पर्श नाहीये. अष्टविनायकाची यात्रा म्हणजे भक्ती, श्रद्धा, आनंद आणि मानसिक शांतता याच बरोबर सात्विक समाधान तर होतेच शिवाय गणपतीवरील आपली श्रद्धा अजूनच गहिरी होत जाते.

चला तर मग अष्टविनायकाची महती आणि माहिती थोडक्यात जाणून घेऊयात.

मोरगावचा मयूरेश्वर
मोरगावचा मयूरेश्वर

मोरगावचा मयूरेश्वर अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. त्याला मोरेश्वर असेही म्हणतात. पूर्वीच्या काळी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर मोठा उत्पात मांडला होता. तेव्हा या असुराचा नाश करण्यासाठी सर्व देवांनी गणपतीची आराधना केली.तेव्हा गणपतीने मोरावर आरूढ होऊन या सिंधू असुरचा वध केला म्हणूनच गणपतीला तेव्हा मोरेश्वर असे नाव पडले. तसेच या गावात मोरांची संख्या ही खूप जास्त असल्याने या गावाला मोरगाव असे म्हणतात. या गणपतीच्या पूजेचा वसा थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी घेतला होता.  
श्री मोरेश्वराच्या डोळ्यांत आणि बेंबीत हिरे बसवलेले आहेत. ही मयुरेश्वराची म्हणजेच गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. या मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्याही मुर्त्या आहेत. सध्याची मयूरेश्वराची मूर्ती ही खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. खरी मूर्ती ही लहान वाळू, लोखंडाचे अंश आणि हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती देखील आहे. अशी आख्यायिका आहे की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती रथातून नेत असताना इथे आल्यावर रथाचे चाक तुटते त्यामुळे या मूर्तीला इथेच ठेवण्यात आले.

थेऊर गावचा चिंतामणी

थेऊर गावचा चिंतामणी – अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे थेऊर गावचा चिंतामणी. कपिला ऋषींनी आपल्याजवळील चिंतामणी रत्नाचा उपयोग करून आपल्या आश्रमात भेट द्यायला आलेल्या गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वान्न खाऊ घातले. पण गणासुरला त्या चिंतामणी रत्नाचा मोह झाला आणि त्याने ते कपिला ऋषींकडून हिसकावून घेतले. मग कपिला ऋषींनी दुर्गा देवीच्या म्हणण्यानुसार गणपतीची मदत घेतली. मग गणपतीने गणासुराला कंदब वृक्षाखाली पराभूत करून चिंतामणी रत्न काढून घेतले आणि कपिला ऋषींना परत दिले. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी चिंतामणी रत्न गणपतीच्या गळ्यात बांधला म्हणून त्याला चिंतामणी विनायक म्हणून ओळखले जाऊ लागले. सगळ्यांची चिंता दूर करतो म्हणून तो चिंतामणी असेही म्हणतात. चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. येथील चिंतामणीची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच डोळ्यांत माणिक रत्न आहेत.

सिद्धटेकचा सिद्धिविनायक

सिद्धटेकचा सिद्धिविनायक – अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेक चा सिद्धिविनायक. आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यासाठी ‘ॐ’ काराचा अखंड जप करून गणपतीला प्रसन्न केले आणि आपली सृष्टी निर्मितीची इच्छा सांगितली. आणि गणपतीनेही ब्रह्मदेवाची ही इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला. परंतु मधु आणि कैतभ हे विष्णू देव निद्राधीन असताना त्यांच्या कानातून निर्माण झालेले दैत्य देवी देवतांना छळू लागले. तेव्हा विष्णू देवाने शंकराच्या सांगण्यावरून ‘ॐ गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करून सिद्धी प्राप्त केली आणि त्या दोन दैत्यांचा वध केला. विष्णूने ‘ॐ गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करण्यासाठी सिद्धटेक या ठिकाणची निवड केली होती. गणपतीची मूर्ती ही उत्तराभिमुख आणि स्वयंभू असून गणपतीची सोंड उजवीकडे आहे. इथे गणपतीची प्रदक्षिणा करणे म्हणजे पूर्ण डोंगराची प्रदक्षिणा करण्यासारखेच आहे कारण इथे गणपतीची मूर्ती ही डोंगराला जोडलेली आहे.


रांजणगावचा महागणपती

 रांजणगावचा महागणपती – अष्टविनाकांपैकी रांजणगावचा महागणपती हा चौथा गणपती. दंतकथेनुसार ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर याने अहंकाराने उन्मत्त होऊन स्वर्गलोक आणि पृथ्वी वरील लोकांना त्रास देऊ लागला. केवळ शंकरच त्रिपुरासुराचा वाढ करू शकत होते हे सगळ्या देवांना माहित असल्याने सगळ्या देवांनी शंकराकडे धाव घेतली. मग शंकराने गणपतीचे आवाहन करून त्रिपुरासुराचा वध केला आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले. दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. कमळावर विराजमान आसलेली गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि रिद्धी सिद्धी त्याच्या सोबत आहेत. रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे.


ओझरचा विघ्नेश्वर

ओझरचा विघ्नेश्वर – अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नेश्वर हा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. कारण विघ्नेश्वराच्या कपाळावर हिरा आणि डोळ्यांत माणिक आहेत. येथील श्रींची मूर्ती लांब आणि रुंद असून स्वयंभू आहे. गणपतीची ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. आख्यायिकेनुसार अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ केला आणि त्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी संतप्त इंद्राने विघ्नासुराला पाठवले. परंतु विघ्नासुराने यज्ञ बंद तर केला पण त्याचबरोबर विश्वामध्ये देखील अनेक विघ्ने निर्माण केली. मग समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीने विघ्नासुराचा पराभव केला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो.


लेण्याद्री चा श्री गिरिजात्मज

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज – गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा. अष्टविनायकातील सहावा आणि एकच असा गणपती ज्याचे स्थान पर्वतावर आहे तो म्हणजे लेण्याद्री चा श्री गिरिजात्मज. पार्वतीने गणपती हा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून लेण्याद्री च्या पर्वतावर तपश्चर्या केली आणि अंगाच्या मळापासून गणेशाची मूर्ती बनवली. गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. गणपतीचे हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गिरिजात्मज रुपात असलेली गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे.


महड गावचा वरदविनायक

महड गावचा वरदविनायक – अष्टविनायकातील महडचा वरदविनायक हा सातवा गणपती. १९८० मध्ये धोंडू पौडकर या गणेशभक्तला मूर्ती तळ्यात सापडली. इथे आपल्याला गणपतीच्या दोन मुर्त्या दिसतात. एक गाभाऱ्याच्या आत आणि दुसरी गाभाऱ्याच्या बाहेर. तळ्यात सापडलेली मूर्ती तिची अवस्था जीर्ण होत असल्याने ती गाभाऱ्याच्या बाहेर एका काच पेटीत ठेवली आहे. ही मूर्ती शेंदुराने माखलेली असून डाव्या सोंडेची आहे. आणि दुसरी मूर्ती जी गाभाऱ्याच्या आत आहे ती शुभ्र संगमरवराची, तिची सोंड उजवीकडे आहे. श्री वरदविनायक हा नवसाला पावणारा गणपती आहे असे मानतात.

पाली गावचा बल्लाळेश्वर


पाली गावचा बल्लाळेश्वर – अष्टविनायकातील आठवा आणि एकमेव असा गणपती जो त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो. इथे गणपतीची मूर्ती एका दगडी सिंहासनावर स्थिर आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *