सध्या महाराष्ट्रात काय परिस्तिथी आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आपल्या नवीन आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या लगेचच कामाला सुरुवात केली आहे. पदा वर आल्या आल्या आरे कॉलनी चा विषय ‘ पुन्हा ‘ सुरू केलाय. म्हणजेच मेट्रो साठी लागणारे कारशेड हे आरे कॉलनीतील परिसरात बांधण्याचे पुन्हा चालू केले आहे. आरे कॉलनी हे प्रकरण जुने नाही. पण तरीही हे प्रकरण काय आहे हे आधी थोडे जाणून घेऊयात.
तर ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधली. ६ ऑक्टोबर च्या रात्री आरे कॉलनीत १८०० झाडांची मोकाट सुटल्या प्रमाणे कत्तल करण्यात आली. ही कत्तल रातोरात आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात करण्यात आली. ही झाडांची हत्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि वरिष्ठ पदावर असलेल्यांच्या सांगण्यावरून करण्यात आली होती. आरे कॉलनीत तब्बल २३०० झाडे होती. त्यातली १८०० तर तोडली.
आरे कॉलनी तील ही वृक्षतोड योग्य की अयोग्य ?
आरे कॉलनी ही ३,१६६ एकर इतक्या परिसरात ही झाडे पसरली होती त्यामुळे याला जंगलाचे स्वरूप आले होते. पण या जंगल रुपी आरे कॉलनीत दुबती जनावरे होती. त्याचबरोबर इथे बिबट्या, हरीण, मुंगूस, जंगली मांजर आणि अशी अनेक कदाचित दुर्मिळ जनावरेही या जंगलरुपी आरे कॉलनीत होती. मुळात डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दुबत्या जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी आरे मिल्क कॉलनीचे उद्घाटन केलं गेले होते. ४ मार्च १९५१ मध्ये तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वृक्षारोपण करून या आरे मिल्क कॉलनी ची सुरुवात केली होती. म्हणजेच ही सगळी झाडे ६० ते ७० वर्ष जुनी होती. यातली कुठलीही झाडे ही तोडणाऱ्यांनी लावली नव्हती.
जेव्हा ही झाडे तोडण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी तसेच लोकांनीही या गोष्टीला खूप विरोध केला होता. यासाठी लोकं रस्त्यावर उतरले होते. आंदोलन करत होते. झाडे वाचवा म्हणून घोषणा करत होते. पण हे सगळ निष्फळ ठरले. आणि आरे तील २,१४१ झाडे तोडली गेली आहेत असे एमएमआरसी (MMRC) म्हणजेच मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरण यांनी मान्य केले. आणि त्या बदल्यात २०,००० झाडं लावल्याचा दावाहि केला गेला पण तो कितपत खरा खोटा हे माहीत नाही.
पण ही बेमुदत कत्तल केली गेलेली झाडे पुन्हा येणार नाहीत. ती नैसर्गिक रित्या वाढलेली झाडे होती. त्याबदल्यात कितीही झाडे लावली तरी त्यातली किती जगतील नाही जगतील माहीत नाही. ज्या मेट्रो कारशेड साठी ही एवढी झाडे तोडली गेली होती तो मेट्रो कारशेड प्रकल्प नंतर तिथून हलवण्यात आला होता. पण आता ‘ पुन्हा ‘ हा प्रकल्प आरे कॉलनीत चालू करण्यात आला आहे. तर आरे कॉलनीतील हा पुन्हा चालू झालेला मेट्रो कारशेड प्रकल्प योग्य की अयोग्य ?