आज आम्ही माहिती घेऊन आलोय दख्खनच्या राणीची. दख्खन ची राणी म्हणजे आपली डेक्कन क्वीन म्हणजे आपली ट्रेन ओ! डेक्कन क्वीन ही १ जून १९३० रोजी ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली. डेक्कन क्वीन ही पहिली भारतीय सुपरफास्ट ट्रेन, लांब पल्ल्याची ट्रेन आणि विजेवर धावणारी ट्रेन होती. ही ट्रेन मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडते. त्या काळात या गाडीचा उपयोग मुख्यत्वेकरून घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत असे. आता डेक्कन क्वीन ट्रेनचा प्रवास साधारणतः मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), दादर, ठाणे, कर्जत, खंडाळा, लोणावळा, शिवाजीनगर, पुणे असा आहे. परंतु पूर्वी ही ट्रेन कल्याण स्टेशनला देखील थांबत होती. डेक्कन क्वीन सर्व प्रथम कल्याण ते पुणे या लोहमार्गावर धावली.
आता ती कल्याणला थांबत नाही. यामागे एक छोटासा इतिहास आहे पण त्याचे पडसाद आजही कल्याण शहराला भोगावे लागत आहेत. कल्याण हे एक महत्वाचे स्थानक आहे की जे मुंबईला उत्तर आणि दक्षिण भागाला जोडते. कल्याण स्थानकात दररोज लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरी अशा एकूण ९०० हून अधिक गाड्या थांबतात. त्यामुळे गाडी कुठलीही असो मुंबईत येणारी किंवा मुंबईच्या बाहेर जाणारी तिला कल्याण थांबा हा निश्चितच असतो. पण डेक्कन क्वीन ही एक अशी ट्रेन आहे की जी मुद्दामहुन कल्याण स्टेशनला थांबवली जात नाही. तर याचे कारण असे की कल्याण नगरपालिकेकडून रेल्वेचा झालेला अपमान असे रेल्वे मनात होती.
पूर्वी जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा ज्या हद्दीतून म्हणजे सिमेतून ट्रेन जायची त्या त्या सीमेच्या नगरपालिकेला रेल्वे काही कर देऊ करत होती. आणि तो कर भरणे हे रेल्वेला बंधनकारक होते. तसेच डेक्कन क्वीन ची धाव कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून होती. त्याबदल्यात रेल्वे प्रशासन कल्याण नगरपालिकेला काही कर देऊ करत असे. सुरुवातीला सगळे सुरळीत होते. पण नंतर पुढे काही वर्षे रेल्वे प्रशासनाने तो कर कल्याण नगापलिकेला दिला नाही किंवा रेल्वेकडून भरला गेला नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले आणि रेल्वेवर खटला दाखल केला. कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन या गाडीचे इंजिन जप्त केले. तेव्हा रेल्वे अधिाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन सगळा कर भरला मग कल्याण नगरपालिकेने ही जप्त केलेले गाडीचे इंजिन रेल्वे ला परत केले.
ही गोष्ट इथेच न थांबता रेल्वेला हा आपला अपमान सहन नाही झाला आणि म्हणूनच रेल्वे प्रशासनाने कल्याण स्टेशनला डेक्कन क्वीन गाडी कधीही न थांबवण्याचा निर्णय घेतला. डेक्कन क्वीन गेली ९१ वर्षे धावत आहे पण रेल्वेने घेतलेला तो निर्णय आजही पाळला जातोय. यानंतर प्रवाशांची सोय व्हावी यासाठी डेक्कन क्वीन ला कल्याण स्टेशनला थांबा मिळावा अशी अनेक वेळा मागणी रेल्वे कडे केली गेली परंतु रेल्वे कडून डेक्कन क्वीन च्या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.