“उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली”
“उठा उठा दिवाळी आली, फटाके फोडायची वेळ झाली”
“उठा उठा दिवाळी आली, फराळ खायची वेळ आली.”
दिवाळी आली की अशा ओळी आपल्या कानावर पडतातच पडतात किंवा आपणच ते गुणगुणतो. दिवाळी म्हटली की सगळीकडे रोषणाई, दिव्यांची आरास, दारावर सुंदर अशी रांगोळी आणि फटाक्यांचा आवाज…..! खरं म्हणजे दिवाळी हा दिव्यांचा सण. दिवाळीच्या दिवशी प्रभू राम रावणाचा पराभव करून आणि आपला १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील प्रजेनी या आनंदाच्या प्रसंगी संपूर्ण शहर मातीच्या दिव्यांनी सजवले. अशी आख्यायिका आपण सर्वांनाच माहित आहे. आंधरावर प्रकाशाचा विजय याचे प्रतीक म्हणून आपण आजही दिवाळी दिव्यांनी साजरी करतो.
काळानुरूप दिवाळीला दिव्यांबरोबर कंदील आले, लाइट्स पण आले आणि त्याच बरोबर आले फटाके. प्रभू राम परत आले तेव्हा अयोध्येतील लोकांनी फटाके फोडले होते याची नोंद कुठेही नाहीये. पण हल्ली दिवाळीची व्याख्याच दिवे आणि फटाक्यांचा सण अशी झाली आहे. खरं म्हणजे फटाक्यांशिवाय दिवाळी पूर्णच होत नाही.
पण मग नेमकी फटाके वापरायची सुरूवात झाली कधीपासून ?
खरा फटाक्यांचा शोध लागला चीनमध्ये ७ व्या शतकात. ते गनपावडर चा उपयोग फटाके बनवण्यासाठी करत. जसं जशी फटाक्यांची लोकप्रियता वाढत गेली तस तशी ही फटाक्यांचे तंत्रज्ञान इतरत्र पसरत गेले. १४०० AD. मध्ये युद्धासाठी पहिल्यांदा गन पावडर वापरली गेली.
भारतातला पहिला फटाक्यांचा कारखाना १९४० मध्ये शिवकशी येथे सुरू झाला. हा कारखाना सुरू केला दोन भावंडांनी अय्या नाडर आणि षणमूगा नाडर यांनी. शिवकाशी कारखान्यातील फटाक्यांची लोकप्रियता एवढी वाढली की १९८० पर्यंत शीवकाशी मध्ये फटाक्यांचे १८९ कारखाने सुरू झाले. तेव्हा शिवकाशी हे एकमेव ठिकाण होते जिथून फटाके संपूर्ण देशात पाठवले जायचे.
खरं बघायला गेलो तर दिवाळीचा आणि फटाक्यांचा काहीही संबंध नाही. पण आता ते एक फॅड बोला किंवा ट्रेण्ड किंवा फॅशन झाले आहे. फटाके वाजवावे कारण हल्ली फटक्यांशिवय दिवाळी शांत वाटते. पण ते कमी प्रमाणत वाजवावे. ही दिवाळी तुम्हा आम्हा सर्वाना साठी खूप खूप आनंद, सुख आणि भरभराट घेऊन येवो. शुभ दीपावली.