श्रावण चालू झाला की आपल्या सणांना सुरूवात होते. अजून गणपती बाप्पाच्या आठवणी ताज्या आहेत तर इकडे परत देवीच्या आगमनाची तयारी करायची. म्हणजेच नवरात्रीची ओ… नवरात्र म्हणजे नऊ रात्री. नवरात्र हा सण दरवर्षी शरद ऋतूत साजरा करतात. पण तुम्हाला माहितीये नवरात्री फक्त एकदा नाही तर वर्षातून ४ वेळा साजरी करतात. सर्वात पहिली आणि जास्त साजरी केली जाणारी नवरात्री म्हणजे शरद ऋतूतील जी सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये येते. दुसरी नवरात्री येते ती म्हणजे चैत्रात चैत्र नवरात्री. तिसरी नवरात्र म्हणजे माघ नवरात्र तिला वसंत पंचमी असे देखील म्हणतात. ही नवरात्र माघ महिन्यात येते. चौथी नवरात्री येते ती आषाढ महिन्यात आषाढी नवरात्र.
या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय नवरात्री ती म्हणजे शरद ऋतूतील नवरात्र. नवरात्री ही नऊ रात्र आणि दहा दिवस साजरी करतात. नवरात्री ची कथा अशी आहे की महिषासुर नावाचा राक्षस ब्रह्म देवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि त्यांच्या कडून वरदान प्राप्त केला की पृथ्वी वरील कोणताही मनुष्य किंवा देवता किंवा दानव त्याचा नाश करू शकणार नाही.
या वरदानाने तो खूप गर्वित आणि अहंकारी झाला. त्याने तीनही लोकांवर विजय प्राप्त करून सगळीकडे हाहाकार मांडला. मग या महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रम्हा विष्णू आणि महेश या तिनही देवांसह सगळ्या देवांनी दुर्गा देवीची आराधना केली. मग दुर्गा देवीचे आणि महिषासुराचे नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय होतोच याचे प्रतीक म्हणून दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करतात.
या शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांचे नऊ दिवस पूजन केले जाते.
- शैलपुत्री – नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदेपासून सुरूवात होते. हा पहिला दिवस शैल पुत्री म्हणजे डोंगराची मुलगी या पार्वतीच्या रूपाचे पूजन केले जाते. या रुपात दुर्गा देवीची पूजा शिवाची पत्नी म्हणून केली जाते. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो.
2. ब्रम्हचारिणी – ब्रह्मचारिणी हा पार्वतीचा दुसरा अवतार आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या अवताराची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी या अवतारात देवी एक अविवाहित आणि ब्रह्मचारिणी रुपात दिसते. देवीच्या या रुपात एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलु आहे.
3. चंद्रघंटा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा या पार्वतीच्या तिसऱ्या अवताराची पूजा केली जाते. शिव आणि पार्वतीचे लग्न झाल्यावर पार्वती आपले मस्तक अर्ध चंद्राने सजवते. या रुपात देवीला दशभुजा आहेत. या देवीचे वाहन सिंह आहे.
4. कुष्मांडा – चतुर्थीच्या दिवशी देवी कुष्मांडा या रुपात पूजा केली जाते. कुष्मांड म्हणजे कोहळा. आणि एक कोहळ्यात भरपूर बिया असतात. आणि प्रत्येक बी मध्ये अनेक कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणूनच देवीला विश्वाची सृजनशील शक्ती म्हणतात. कुष्मांडा अवतारात देवीला आठ हात आहेत आणि देवी वाघावर बसलेली आहे.
5. स्कंदमाता – स्कंद म्हणजे कार्तिकेय याची माता म्हणजेच पार्वती तिची स्कंदमाता या अवताराची पूजा केली जाते. इथे बाल कार्तिकेय सह देवी सिंहावर बसलेली दिसते. या रुपात देवीला चतुर्भूजा आहेत. आणि दोन हातानी आपल्या बालकाला सांभाळत आहे.
6. कात्यायनी – कात्यायनी देवी ही योद्धा देवी म्हणून ओळखली जाते. ती दुर्गा देवीचा अवतार आहे. ती पार्वती, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचेही रूप आहे. या रुपात देवीला चतुर्भुजा आहेत आणि ती सिंहावर स्वार आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे षष्ठी ला देवीच्या या रुपाची पूजा करतात.
7. कालरात्रि – कालरात्री हे दुर्गा देवीचे सर्वात क्रूर रूप आहे. तिला चार भुजा आहेत आणि तिने वाघाची कातडी परिधान केलेली आहे. या देवीचे वाहन गाढव आहे. कालरात्री हे देवीच्या काली, महाकाली, चामुंडा, भद्रकाली अशा अनेक क्रूर अवरांपैकी एक आहे. देवीच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप राग दिसतो त्यामुळे तिची त्वचा काळी पडते. शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीने कालरात्रीचे रूप धारण केले असे मानले जाते.
8. महागौरी – कालरात्रीने शूंभ आणि नीशुंभ राक्षसांचा वध केल्यानंतर गंगा नदीमध्ये स्नान केले तेव्हा तिचा गडद काळा रंग निघून गेला आणि तिची त्वचा पुनः उजळ झाली. पुरान कथेनुसार महादेवाला प्राप्त करण्यासाठी देवीने आठव्या वर्षापासून कठोर तपस्या केली. म्हणून महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी करतात. या रुपात देवीचे वाहन बैल आहे.
9. सिद्धिदात्री – दुर्गा देवीचे नववे रूप म्हणजे सिद्धिदात्री. सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी धारण करणारी किंवा देणारी. असे म्हणतात की भगवान शिवाने सिद्धिदात्री देवीची पूजा करून सर्व सिद्धी प्राप्त केली. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले. आणि म्हणून शिवाला अर्धनारीनटेश्वर असे म्हणतात. सिद्धिदात्री देवी हा पार्वतीचा दुसरा अवतार आहे.
Khupach chhan