आपण लहानपणी भारताचा नकाशा तर भरलाच असेल. त्यात अरबी समुद्र, हिंदी महासागर, श्रीलंका, बंगालचा उपसागर अशा सोप्या सोप्या गोष्टी आपण लगेच भरून मोकळे होयचो. कारण त्याची जागा नेहमी तिथेच असायची हे आपल्याला पक्क असायचे आणि ते भरावेच लागायचे. पण भारताच्या नकाशात समुद्र असणे ठीक आहे पण श्रीलंका का दाखवतात. आपण भारताचा कोणताही नकाशा घेतला म्हणजे पेपर वरचा असो वा त्याची सॉफ्ट कॉपी असो, मोठा चार्ट वरचा असो किंवा अजून काही भारताच्या प्रत्येक नकाशात श्रीलंका देश असतोच असतो. मग काय कारण आहे याचे.
भारताच्या नकाशात का दाखवतात श्रीलंका देश
श्रीलंका देश भारताच्या नकाशात दाखवतात याचे कारण काय तर श्रीलंका देश हा भारताचा एक भाग आहे किंवा भारताने श्रीलंकेशी असा काही करार केला आहे म्हणून किंवा रामाने श्रीलंके पर्यंत पुल बनवला होता म्हणून. तर असे काहीही नाही मग भारताच्या शेजारील देश आहे म्हणुन… पण मग भारताच्या शेजारी पाकिस्तान, चीन, म्यानमार हे देखील शेजारील राष्ट्र आहेत मग ते का नाही दाखवत. साधं भूगोल विषयातही भारताच्या नकाशात श्रीलंका देश दाखवतातच. कारण याला कारणीभूत आहे समुद्री कायदा म्हणजेच ओशियन लॉ (Ocean law).
संयुक्त राष्ट्र संघांनी एकत्र येऊन समुद्रासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा यांची निर्मिती केली आणि ते जगभरामध्ये लागू करण्याचे काम केले. १९५६ मध्ये ‘यूनायटेड नेशन्स कनव्हेक्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ (UNCLOS 1) नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती. १९५८ मध्ये समुद्रामधील सीमा आणि निर्बंध यावर चर्चा आणि अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला. १९८२ पर्यंत अशा तीन परिषदा घेतल्या गेल्या आणि सगळ्या नियमांशी आणि करारांशी जगभरातून सहमती मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर समुद्री कायदयांना मान्यता देण्यात आली आणि ते अमलात देखील आणले गेले.
तर काय होता तो समुद्री कायदा
संयुक्त राष्ट्रांनी एक ओशियन लॉ म्हणजेच समुद्री कायदा पास केला होता. तो कायदा असा होता की समुद्र किनारा असणाऱ्या कोणत्याही देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून त्या देशाची बेस लाईन ही २०० नॉटिकल मैल इतकी असावी. या २०० नॉटिकल मैल अंतरामध्ये येणारी भौगोलिक ठिकाणे, बेटे किंवा राष्ट्रे देशाच्या नकाशामध्ये दाखवणे बंधनकारक असते. किलोमिटर च्या भाषेत सांगायचे झाले तर एक नॉटिकल म्हणजे १.८२४ किलोमिटर होय. म्हणजे २०० नॉटिकल मैल अंतर म्हणजे ३७० किलोमिटर. याचाच अर्थ देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून ३७० किलोमिटर पर्यंत च्या सर्व गोष्टी नकाशात दाखवल्या जातात.
यादृष्टीने श्रीलंकेचा विचार केला तर श्रीलंका हे धनुषकोडी जे भारताचे शेवटचे टोक आहे इथून १८ मैल इतके अंतरावर आहे. आणि म्हणूनच भारताच्या नकाशात श्रीलंका देश दाखवावाच लागतो.