एक बातमी सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनली आहे. ती म्हणजे “राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार म्हणून ओळखली जाणार.” लोकांच्या आग्रहास्तव आणि लोकांच्या विनंतीचा मान ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोठी घोषणा केली.
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जायचे. त्यांचे पूर्ण नाव ध्यानचंद सिंग असे आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ साली अलाहाबाद मध्ये झाला. १९२२ मध्ये मेजर ध्यानचंद हे ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई म्हणून काम करत होते. त्याच बरोबर ते आर्मी हॉकी स्पर्धा खेळायचे.
मेजर ध्यानचंद यांनी हॉकी मध्ये त्यांची उत्तम कामगिरी करुन १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या उत्कृष्ट चेंडू नियंत्रणाच्या कौशल्यामुळे त्यांना हॉकी चे जादूगार म्हणुन देखील ओळखायचे. त्यांची हॉकी खेळातील कारकीर्द इतकी जबरदस्त होती की ते हॉकी खेळात असतानाही आणि रिटायर झाल्यानंतरही हॉकी खेळाडूंवर त्यांचा प्रभाव कायम राहिला आणि त्याचाच परिणाम १९२८ ते १९६४ या दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये दिसून येतो. १९२८ ते १९६४ या दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धे पैकी ७ स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवले. १९२६ ते १९४९ मेजर ध्यानचंद हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले. या कालावधी दरम्यान त्यांनी १८५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यात ५७० गोल केले जे की हॉकी च्या इतिहासातील सर्वात जास्त गोल आहेत.
१९३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. यात भारत विरुद्ध जर्मनी असा हॉकीचा शेवटचा सामना होता. या सामन्यात भारताने जर्मनीला ८-१ असे चीतपट केले. या सामन्यात ध्यानचंद यांनी ३, रूपसिंग, टॅपसेल आणि जाफर यांनी प्रत्येकी १ आणि दारा यांनी २ असे एकूण ८ गोल केले. १९३६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांनी एकूण १२ सामने खेळले होते त्यात त्यांनी ३३ गोल केले. ध्यानचंद यांच्या या कौशल्याने जर्मन नेते एडॉल्फ हिटलर हे इतके प्रभावित झाले होते की त्यांनी ध्यानचंद यांना जर्मन चे नागरिकत्व आणि जर्मन सैन्यात कर्नल पदाची ऑफर देऊ केली. परंतु ध्यानचंद यांनी त्या दोन्हीही गोष्टी नाकारल्या.
१९५६ मध्ये ध्यानचंद यांनी भारतीय सैन्यातून निवृत्ती घेतली. आणि त्याच वर्षी भारत सरकारने मेजर ध्यानचंद यांना पद्म भूषण देऊन सन्मानित केले.
३ डिसेंबर १९७९ ला ध्यानचंद यांचा मृत्यू झाला. २९ ऑगस्ट ही मेजर ध्यानचंद यांची जन्म तारीख राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी केली जाते. २००२ मध्ये मेजर ध्यानचंद यांच्या नावे ध्यानचंद पुरस्कार दिला जाऊ लागला. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील आजीवन कामगिरीसाठी दिला जातो. २००२ मध्येच मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील राष्ट्रीय स्टेडियम चे नाव ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम असे करण्यात आले.