भारत म्हणजे “सोने की चिडिया” असे म्हणायचे हे आपल्याला माहीत आहे. याच सोने की चिडिया ला बघून इंग्रज व्यापार करण्याच्या दृष्टीने भारतात आले. भारतातील सोन्याचा साठा हा जवळ जवळ ६५७ टन इतका आहे. भारतात सोन्याची मागणी आणि वापर जास्त असला तरी सोन्याचा हा साठा खूप कमी आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार सोन्याच्या साठयाच्या बाबतीत भारत ९व्या क्रमांकावर आहे.
मग सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे तरी कोणाकडे ? आणि ते कुठे ठेवतात ?
तर सर्वात जास्त म्हणजे तब्बल ८१३४ टन इतका सोन्याचा साठा आहे अमेरिकेकडे. जवळजवळ भारताच्या १३ पट पेक्षाही जास्त सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. जसे भारतातील सोने भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये साठवले आहे तसेच अमेरिकेने त्यांच्याकडच्या सोन्याचा साठा बुलियन डिपॉझिटरीमध्ये जमा केला आहे.
जगात सर्वात जास्त सोने भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत आढळते. दक्षिण कर्नाटक मध्ये कोलार जिल्ह्यात सोन्याची मोठी खाण आहे. पण ही खाण २८ फेब्रुवारी २००१ मध्ये बंद करण्यात आली. त्यावेळी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने ही खाण तेव्हाच बंद केली गेली असे सांगितले जाते. या खाणीत अजूनही सोने तसेच असेल तरीही ही सोन्याची खाण अजूनही चालू केली गेली नाहीये. दक्षिण कर्नाटकातील कोलार ही खाण जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची खाण होती.
भारतात आता सोन्याच्या इतर तीन खाणीतून सोने मिळवले जाते. या तीन खाणी आहेत कर्नाटकच्या हूट्टी आणि उती मध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिन इथे. फेब्रुवारी २०२० मध्ये अशी बातमी होती की भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभाग (जीएसआय) यांना उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यात अजून दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. ती दोन ठिकाणे म्हणजे सोनापहाडी आणि हरदी. जीएसआयच्या तज्ञांच्या अंदाजानुसार सोनापहाडीमध्ये २७०० लाख टन सोने सापडले आहे. तर हरदीमध्ये ६५० लाख टन सोनं सापडलं आहे. पण या खाणी सोन्याच्या उत्खननासाठी चालू केल्या गेल्या नाहीयेत.
सोन्याचा भाव कसा ठरतो आणि कोण ठरवतो ?
जागतिक स्तरावर सोन्याचा भाव लंडन मध्ये ठरतो. मग लंडनमध्येच का ? कारण तेव्हा सर्व जगात ब्रिटिशांचीच सत्ता होती. १९१९ पासून “लंडन बुलियन मार्केट” मध्ये रोजच्या रोज सोन्याचा भाव ठरत असे. तेव्हा एकदाच सोन्याचा भाव ठरवला जायचा. परंतु १९६८ नंतर म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर हा सोन्याचा भाव दिवसातून दोन वेळा ठरवला जाऊ लागला. लंडन वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता आणि दुपारी ३ वाजता सोन्याची किंमत ठरवली जाते. दिवसातून दोन वेळा यासाठी कारण दुपारी ३ नंतर अमेरिकी बाजार सुरू होतो. तर भारतात सोन्याचा भाव कोणतीही सरकारी यंत्रणा ठरवत नाही. सोन्याच्या मागणीनुसार आणि आंतररष्ट्रीय बाजारपेठेत जो भाव ठरतो त्या किमतीच्या आसपास सोन्याचा भाव निश्चित केला जातो.
सोने उत्पादनात भारत अग्रेसर नसला तरीही सोने आयातीच्या बाबतीत भारत नक्कीच अग्रेसर आहे. कारण भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर सोन्याला एक भावनिक महत्त्व त्यामुळे भारतात सोन्याची मागणी प्रचंड आहे. जागतिक स्तरावर भारत देश हा सोने व्यापाऱ्यांसाठी एक मोठा ग्राहक आहे.