आपण काही दिवसांपूर्वीच बातमी बघितली असेल लता मंगेशकर आपल्यात नाही म्हणून. क्षणभर काळीज थांबल्या सारखे झाले ही बातमी ऐकून. त्या दिवशी संपुर्ण भारत देश जणू काही थांबला होता, रडला होता. भारताने आपली ‘ गानकोकिळा ‘ गमावली होती. लता दीदीं बद्दल सांगायचे झाले तर शब्दच कमी पडतील अशा त्या…. २८ सप्टेंबर १९२९ साली त्यांचा जन्म इंदूर मध्ये झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव ‘ हेमा ‘ असे ठेवण्यात आले होते. नंतर ते बदलून ‘ लता ‘ असे केले. त्यांनी ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्येच नाही तर काही परदेशीय भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. जास्त करून त्यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
दीदींनी आता पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत प्रेम, विरह, मस्करी, वैराग्य आणि भजन देखील. त्यांचे ‘अजीब दासता है ये, काहा शुरू कहा खतम…. ‘ हे दिलं अपना और प्रीत पराई या चित्रपटातील गाणे हे अजूनही तेवढेच नवीन आणि ताजेतवाने वाटते जेवढे ते आधी होते.
हेच काय तर ‘ आपकी नजरोने समझा… हे अनपढ चित्रपटातील गाणं ‘
‘लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो’
अशी अनेक आणि सगळीच गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्याने मनात एक वेगळीच जागा करून ठेवलीय.
एक काळ असा होता की ‘गिनीज बुक’ मध्ये येणार होते लता मंगेशकर यांचे नाव.
हो ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ मध्ये लता मंगेशकर यांचे नाव २५००० इतकी सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करण्यासाठी नाव नमूद करण्यात आले होते. परंतु या गोष्टीवर काहींनी आक्षेप घेतल्याने आणि दिदिंनाही आपल्या सगळ्या गाण्यांची नावे देणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक मधून हटविण्यात आले.
लता मंगेशकर यांचे शेवटचे रेकॉर्डिंग कोणते ?
लता मंगेशकर यांचे शेवटचे रेकॉर्डिंग हे १२ डिसेंबर २०१८ मध्ये केले होते. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरमल यांच्या लग्नाच्या वेळी लता दीदींनी गायत्री मंत्र म्हटले होते.
त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून आपल्या कारकिर्दीची ची सुरुवात केली. त्यांचे सर्वात पाहिले गाणे ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी‘ हे ‘किती हसाल‘ (१९४२) या मराठी चित्रपटातील होते. पण काही कारणास्तव ते चित्रपटातून वगळण्यात आले.
लता मंगेशकर यांना भारत सरकारने १९६९ मध्ये पद्मभूषण, १९८९ ला दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ ला पद्मविभूषण, २००१ ला भारतरत्न आणि २००८ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त “वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट” हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर अनेक महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील लता मंगेशकर यांना मिळाले आहेत.
“ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भरलो पाणी…’ या गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दिदिंचा सत्कार केला होता. अशी स्वसम्राज्ञी पुन्हा होणे शक्य नाही..