आता सध्या दिवाळीचा सण चालू होणार आहे. सगळ्यांची मग लगबग चालू होते दिवाळीच्या खरेदीची. मग ती खरेदी बाजारात जाऊन केलेली असो वा घरात बसून ऑनलाईन केलेली असो हल्ली सगळ कॅशलेस झाले आहे. कॅशलेस म्हणजे फ्री नाही हा… कॅशलेस म्हणजे नकद पैसे न देता ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणे. आता सध्या तर काय QR code चा जमाना आहे. १० रुपये असो वा १०,००० असो QR code ने स्कॅन करून आपण पटकन पैसे देऊन टाकतो. हल्ली तर जिथे तिथे हे QR Code चे चौकोनी छोट्या मोठ्या काळ्या पांढऱ्या रंगाचे विशिष्ट पॅटर्न असलेले स्कॅनर आपल्याला आजकाल जिथं तिथं दिसतात. सध्या भाजीवाला असो वा रिक्षा वाला किंवा किरणा वाला यांच्याकडे तर सर्रास बघायला मिळतो.
आजकाल लोकं हार्ड कॅश किंवा क्रेडिट डेबिट कार्ड वापरण्यापेक्षा असे QR code स्कॅन करणे जास्त पसंद करतात. पण तुम्हाला माहिती आहे आहे का की काय असते या काळ्या पांढऱ्या चौकोनी बॉक्स मध्ये ? नाही ना….
QR code म्हणजे काय ?
QR code चा फुल्ल फॉर्म आहे Quick Response. QR code हा एक प्रकारचा बारकोड असतो. जो फक्त आणि फक्त स्मार्टफोन्स किंवा QR code reader द्वारेच वाचू शकतो. QR code दिसायला फक्त काळ्या पांढऱ्या रंगाचे चौकोन दिसतात पण जेव्हा आपण ते एखाद्या स्मार्टफोन मध्ये स्कॅन करतो तेव्हा त्यातून आपल्याला बरीच माहिती मिळते. या QR code मध्ये एखाद्या स्टोअर ची माहिती, वेबसाईट लिंक किंवा फोन नंबर आणि अशी बरीच माहिती दडलेली असते.
QR code कोणी बनवला ?
QR code ची ओळख आपल्याला जरी आता झाली असली तरी याची निर्मिती १९९४ मध्येच झाली आहे. डेन्सो वेव्ह (Denso Wave ) या जपानी कंपनीच्या मासाहिरो हारा ( Masahiro Hara) यांनी या QR code प्रणालीचा शोध लावला.
सोप्या भाषेत QR code हे एक प्रकारे टेक्निकल भाषेत encode केलेली शब्द प्रणाली आहे. ज्यातील माहिती ही अल्फानुमेरिक, संख्यात्मक, बायनरी असू शकते.
QR code ही आजकालची व्यवहार करण्याची नवीन पद्धत आहे. या द्वारे व्यवहार करणे अगदी सोपे आणि सहज झाले आहे. QR code द्वारे पैसे देणे किंवा घेणे, एखाद्या गोष्टी ची माहिती मिळवणे हे अगदी सोपे झाले आहे. या QR code मध्ये आपली बरीचशी माहिती यात दडलेली असते. आर्थिक व्यवहार करताना बँक अकाउंट नंबर, IFSC code, आणि अशी इतर माहिती देखील यात नमूद झालेली असते. आणि ती माहिती स्कॅन करताच आपल्या समोर येते. त्यामुळे आर्थिक व्यवहार अत्यंत जलद गतीने होतात. हल्ली लोकं या QR code चा वापर जास्त करतात त्यामुळे विविध प्रकारच्या पेमेंट ॲप्स चा वापरही खूप वाढत चालला आहे.
QR code वापरताना घ्यायची काळजी
जशी कुठलीही गोष्ट परिपूर्ण नसते तसेच QR code मध्येही त्रुटी असतातच. किंबहुना ती निर्माण केली जातात फसवण्याचा हेतूने. ऑलाईन पद्धतीने व्यवहार करताना फसवणुकीचे प्रकार ही कीती होतात हे आपल्याला माहीतच आहे. याच फसवणुकीला Social Engineering Attacks म्हणजेच सामाजिक अभियांत्रिकी हल्ला असे म्हणतात. म्हणूनच QR code वापरताना काय काळजी घायची ते बघू.
QR Code वापरताना पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवणार असता तेव्हा आणि फक्त तेव्हाच तुम्हाला OTP टाकावा लागतो.
जेव्हा तुम्हाला कोणाकडून तरी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार असतील तेव्हा तुम्हाला OTP ची आवश्यकता नसते. जर कोणी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी तुमच्याकडे OTP मागत असेल तर सावध व्हा. कारण तो तुम्हाला फसवतो आहे.
जेव्हा तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तेव्हाच QR code स्कॅन करावा लागतो. तुमच्या खात्यात दुसऱ्याकडून पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला तुमचा QR code स्कॅन करावा लागत नाही.
QR code स्कॅन केल्यानंतर यामध्ये काही तरी विचित्र आहे, अशी शंका आल्यास व्यवहार करणे तत्काळ थांबवावा.